|| श्रींचे अवतारकार्य ||

 

ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रिमुनी यांच्या तपः भावाने व कर्दम ॠषींपासून देवाहुतीच्या ठिकाणी उत्पन्न झालेली कन्या अनसूया हिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने कृतयुगामध्ये त्रिमूर्तिस्वरूप श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. कलियुगामध्ये जुलमी म्लेंच्छ राजांच्या राजवटीत तत्कालीन समाजाची परिस्थिती अत्यंत शोचनीय व दयनीय झाली होती व 'त्राहि भगवन्' असे म्हणण्याची पाळी ज्या वेळी निर्माण झाली त्या वेळी'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे'या देवोक्तीची सत्यता पटवून देण्याकरिताच की काय मद्रास इलाख्यातील पूर्वगोदावरी जिल्हयातील 'पदगया' नामक क्षेत्रात(पीठापूर येथ) 'श्रीपादश्रीवल्लभ' या नावाने श्रीदत्तात्रेयांनी भक्तजनोध्दारार्थ अवतार धारण केला. त्या अवताराची माहिती संक्षेपाने पुढील प्रमाणे आहे

वेदमूर्ती आपलराज या नावाच्या ब्राह्मणाची सुमती नावाची एक साध्वी स्त्री होती. तिने घरी श्राध्द असतानाही आपल्या दारी अतिथिवेषाने आलेल्या श्रीदत्तात्रेयांना भिक्षा घातली. त्यामुळे सन्न होऊन अतिथीने आपले खरे स्वरूप प्रकट केले व'आई हवा तो वर माग 'असे तिला म्हटले. तेव्हा त्या अतिथिवेषधारी श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घालून ती साध्वी म्हणाली की ''आपण ज्या 'आई' या शब्दाने मला यापूर्वी संबाधिले तो शब्द आपण खरा करावा.''श्रीदत्तात्रेयांनी 'तथास्तु' म्हटले. कालांतराने त्यांनी तिच्या उदरी जन्म घेतला. हाच कलियुगातील 'श्रीपादश्रीवल्लभ' या नावाचा श्रीदत्तात्रेयांचा सिद्ध प्रथमावतार होय.

श्रीपादश्रीवल्लभ यांचे जन्मस्थान
पीठापुरम्( तेलगू व आंध्र भाषेत) व पांचाळेश्वर( मराठी भाषेत) हे गाव आंध्र प्रांतात( राजमहेंद्रीभाग,जि. पूव- गोदावरी) आहे. हे क्षेत्र बेझवाडा ते विशाखापट्टण या साऊथ सेंट्रल रेल्वे लाईनवरील राजमहेंद्रीच्या पुढे सामळकोट असे जंक्शन आल्यानंतर 8 मैल अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी मेल सोडून सर्व गाडया थांबतात. सु प्रसिध्द कोकोनाडा शहरापासून 12 मैल मोटरीने जाता येते. इकडे हिंदी,तेलगू, इंग्रजी, कानडी भाषा बोलल्या जातात. मुख्य भाषा तेलगू आहे. येथे धर्मशाळा वगैरे आहेत.

श्रीक्षेत्र कुरवपूर( कुरूगङी), जि. रायचूर(आंध्र राज्य) येथे श्रींनी अवतारकार्य संपविले आहे. मुंबई ते पुणे, पुणे ते रायचूरपर्यत सोलापूरमार्गे मद्रास मेलने यावे. रायचूर स्टेशनवर उतरून टांगा अगर अन्य वाहनाने सिटी टॉकीजजवळ उतरावे; तेथुन सकाळी 8.30 वाजता खासगी मोटार 'यापलदिनीला' जाण्यासाठी निघते.( रायचूर ते गढवाल मार्ग) तेथून बैलगाडीने 'आतकूर' या ठिकाणी जावे. तेथून कोळी लोकांच्या साह्याने नदी ओलांडून 'श्रीक्षेत्र कुरवपूरला' जावे. तेथे सेवेकरी व्यवस्था करितात.

अवतारकार्य समाप्ती( अदमासे इ.स. 1350)
श्रींचे चरित्र श्रीगुरूचरित्रातील अध्याय पाच ते दहामध्ये वर्णन केले आहे. श्रीपादवल्लभ यांनी आपल्या अंध व पंगू असलेल्या दोन बंधूंकडे केवळ कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर त्या दोघांना डोळे व पाय प्राप्त झाले आणि हस्तस्पर्श करताच ते दोघे वेदशास्त्रसंपन्न झाले. तदनंतर एकदा एक विधवा स्त्री आपल्या जडमूढ अशा पुत्रासह कृष्णा नदीत जीव देण्यास निघाली असता तिने नदीतीरावर असलेल्या श्रीपादवल्लभांना पाहून वंदन केले व जन्मोजन्मी असा मूढ पुत्र नसावा व आपल्यासारखा ज्ञानी व जगद्वंद्य असा पुत्र पुढच्या जन्मी मला प्राप्त व्हावा अशी भक्तियुक्त अंतः करणाने त्यांची प्रार्थना केली.''तू शनि दोषाचे दिवशी शंकराची पूजा करावी म्हणजे तुला माझ्यासारखा पुत्र होईल''असे सांगून व तिच्या मूढ पुत्रास ज्ञानसंपन्न करून महाराज गुप्त झाले.ह्या अवतारसमाप्तीपूर्वी तिदिनी अनन्यभावने व भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीपादश्रीवल्लभांचा जाण्यायेण्याचा मार्ग झाडण्याची सेवा करीत असलेल्या एका परिटाच्या अंतःकरणातील ऐहिक सुखोपभोगाची इच्छा ओळखून''तू पुढील जन्मी यवनराजकुलात जन्म घेशील व बालपणापासूनच राजैश्वर्य उपभोगशील व शेवटी तुला माझे दर्शन होईल ''असा वर दिला. लौकिकदृष्टया जरी ह्या अवताराची समाप्ती झाली होती तरी भक्तजनांच्या रक्षणाकरिता व उध्दाराकरिता आपण सदैव सर्वत्र गुप्तपणे आहोत हे सिध्द करण्याकरिता क़ुरवपूरच्या यात्रेस नवस फेडण्याकरिता जात असलेल्या एका ब्राह्मण भक्तास चोरांनी वाटेत गाठून ठार मारले त्या वेळी तेथे प्रकट होऊन श्रीपादवल्लभांनी चोरास ठार केले व आपल्या ब्राह्मण भक्तास जिवंत केले.

यानंतर ज्या ब्राम्हण स्त्रीला शनि दोषव्रताचे आचरण करण्यास सांगितले होते ती स्त्री पुत्र ाप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर व-हाडात करंज नगरातील( हल्ली लाडाचे कारंजे) वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मास आली. जातकावरून तिचे नाव अबांभवानी ठेवण्यात आले. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य वेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणा-या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. पूर्वसंस्कारामुळे ती त्या वेळीही शनि दोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला एक पुत्ररत्न झाले. त्या पुत्राचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच आपले ''श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी'' होत.