|| कारंजा महात्म्य वर्णन ||

विदर्भातील करंजनगर किंवा कारंजा हे शहर श्रीदत्तात्रेयावतार श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराज यांची जन्मभूमी आहे. 500 वर्षापूर्वीच्या काळात त्यांचा जन्म झाला.'करंजमाहात्म्य' हा मूळ ग्रंथ छापील स्वरूपात प्रसिध्द व्हावा अशी ब-याच भक्त लोकांची कित्येक वर्षापासून इच्छा होती.त्या दृष्टीने संस्थानने मूळ ग्रंथाच्या हस्तलिखीत प्रतीवरून( ग्रंथ संस्कृत भाषेत आहे) तो शुध्द करून अर्थासह छापला आहे. त्यात प्रत्येक श्लोकाखाली मराठी अर्थ आहे. शिवाय त्यात पवित्र स्थलांच्या छायाचित्रांचा समवेश आहे. हा ग्रंथ 5 जानेवारी 1984 रोजी छापून प्र सिध्द करण्यात आला. अत्यंत महागाई असतानासुध्दा अल्प किंमतीत(10 रूपये) जवळपास 200 पृष्ठांचा ग्रंथ संस्थानमध्ये विक्रीस ठेवला आहे

वे.शा.सं. श्रीगणेश अंबादास उपाख्य गणपतराव जोशी पुणे यांनी शारीरिक स्वास्थ्य नसतानाही अत्यंत अल्पकाळात संस्कृत हस्तलिखितांचे शुध्दीकरण व मराठी अनुवाद करून देऊन आम्हास सदैव ॠणी करून ठेवले आहे.

आदिमन्वंतरात विन्ध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या या करंजक्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मिळता होती. ॠषिमुनींना पिण्यापुरतेदेखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ॠषींचे शिष्य करंजमुनी यांनी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला.तर इतर मुनींनीही त्याला हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंजक्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले. वसिष्ठ - शक्ति - संवादातून यमुना - माहात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना ह्या बिंदुमती कुंडात आहेत.( बेंबळपार ह्या नावाने सध्या हे कुंड प्रसिध्द आहे.) गंगा व यमुना ह्या कुंडात गुप्त होऊन बिंदुमती(बेंबळानदी) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना - माहात्म्य सांगून रेणुका( एकवीरा)गुप्त झाली. नंतर करंज ॠषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ॠषींनी आपल्या तपःसामर्थ्याने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. सर्व मुनींनी सर्व जलदेवतांना तलावात वास्तव्य करण्याची व तलावास आमचे नाव म्हणजे 'ॠषितलाव' असावे अशी प्रार्थना केली. शिवाय या तलावात अस्थि - विसर्जन केल्यास त्याचे पाण्यात रूपांतर व्हावे असा वरही मिळविला. यानुरूप नद्या व तीर्थे यांनी तलावात अंशात्मक वास्तव्य केले. करंज ॠषीला आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थे व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या. करंज ॠषीने आश्रम - क्षेत्र रक्षणाची असमर्थतता प्र कट केली तेव्हा ॠषीने सांगितले 'ह्या क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवी वास्तव्य करते. ती तुझ्या क्षेत्राचे व आश्रमाचे रक्षण करील.'(यक्षिणी देवीचे मंदीर हाटोटीपु-यात पेंटे यांच्या किराणा दुकानाजवळ आहे.) असे सांगून सर्व ॠषी निघून गेले. यमुनेच्या बिंदुपातापासून बिंदुमती नदी झाली व ॠषींच्या परिश्रमाने 'ॠषितलाव' झाला. यात स्नान करणारा मुक्त होतो अशी प्रसिध्दी आहे.

ॠषी निघून जाण्यापूर्वी यक्षिणीबरोबर त्यांचा संवाद झाला आहे. त्यातच चंद्रतलावाची ख्याती आहे. एकेकाळी चंद्राने गुरूपत्नी तारा हिच्याशी व्यभिचार केला. फलस्वरूप चंद्राला तारेपासून पुत्र झाला तोच बुध आहे. परदारास्पर्शामुळे 'चंद्राला' क्षयरोगी हो असा शाप मिळाला. पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याच्या पायथ्याशी असलेल्या करंज ॠषींच्या आश्रमात करंज क्षेत्राच्या आग्नेय दिशेला स्वतःच्या नावाने चंद्रालय - तीर्थ( सध्या लेंडी तलाव या नावाने प्र सिध्द आहे.) निर्माण करून तेथे तप केले. मग चंद्रेश्वराची स्थापना केली. तेथे बिंदुमतीच्या काठावर कामाक्षीच्या स्वरूपात पार्वती राहीली. विंध्यवासिनी देवी बिंदुमतीच्या काठावर आहे. तलाव खोदण्यापूर्वी करंजमुनींनी हिची प्रार्थना केली होती. या ठिकाणी चंद्र पापमुक्त झाला. चंद्रतलावात स्नान केल्याने मनुष्य रोगमुक्त व पापमुक्त होतो.

करंजमुनींच्या कृपा - प्रसादाने शेषराज'आपल्या कुळासह आपले गरूडापासून संरक्षण व्हावे’ म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून या करंजक्षेत्राला 'शेषांकितक्षेत्र' असे नाव पडले. येथे असलेल्या नागेश्वराचे पूजन करणा-यास कधीही विषबाधा होत नाही. विशेषतः श्रावण शु.5 सोमवार व मंगळवार ह्या दिवशी नागेश्वराचे दर्शन पूजन आणि मंत्रजप केल्याने मंत्रसिध्दी होते.

पुढे करंजाश्रम - महिमा वर्णन केला आहे. त्यातच हरिहरेश्वराचे वर्णन आहे. नंतर ॠषितलावाचे माहात्म्य आहे. शेवटी विष्णु आणि ब्रह्मदेव यांचा संवाद आहे. त्यात मार्गशीर्ष महिन्याचे माहात्म्य वर्णन केले आहे. ग्रंथाच्या शेवटी रेणुका करंजाला सांगते 'सिध्देश्वर चंद्रेश्वर नीलकंठेश्वर प्राणलिंगेश्वर आणि नागनाथ' ही पाच लिंग; एकवीरा यक्षिणी आणि विंध्यवासिनी कामाक्षी या तीन शक्ती यांची त्याच प्रमाणे केशव - राजाची मार्गशीर्ष महिन्यात पूजा केल्याने भगवान विष्णु संतुष्ट होतात.

यमुना नदीची उत्पत्ती देशातील तिचा प्रवास हरिहरेश्वराचे दर्शन मार्गशीर्ष महिना यक्षिणी - मुनी संवाद इत्यादी सर्व सुंदर माहिती मुळातूनच वाचण्यासाठी करंज माहात्म्य वाचावे. सदरहू ग्रंथ संस्थानमध्ये विक्रीकरिता आहे.