|| श्रींचे अवतारकार्य ||
मागील पान |
कारंजा गावातील तत्कालीन शास्त्रीपंडितांच्या सांगण्यावरून तिथिनिश्चय करण्यात आला व यथायोग्य शास्त्रोक्त पध्दतीने मौंजीविधी मोठया आनंदाने व उत्साहाने करण्यात आला. ब्रह्मवृंदांना यथाशक्ति द्रव्य वगैरे देण्यात आले. जन्मतःच ॐकाराचा उच्चार करण्या-या अलौकिक बटूला शास्त्रा प्रमाणे गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला व तो त्याने उच्चार करून ग्रहण केला. शेवटी शास्त्रकर्मानुसार आई भिक्षा घालण्यास आली असता पहिल्या भिक्षेच्या वेळीच त्या बटूने वेदांचा उच्चार केला. अशा प्रकारे तीन वेळा भिक्षा देण्यात आली व त्येक वेळी वेंदातील ॠचेचा उच्चार करीत त्याने ती भिक्षा ग्रहण केली. त्या क्षणापर्यत ॐकाराव्यतिरिक्त अन्य कशाचाही उच्चार न करणारा मुलगा एकदम वेद म्हणू लागला हे पाहून विद्वद््वृंदासहित सर्व लोक दिड्मूढ झाले व सर्वानी त्या दिव्य बटूला नमस्कार केला. जाणत्यांनी ओळखले की हे आगळे स्वरूप म्हणजे देवाचा साक्षात् अवतारच होय.
अशा प्रकारे मौंजविधीचा सोहळा आटोपल्यानंतर बटूने आपल्या मातोश्रीस साष्टांग नमस्कार करून तीर्थयात्रेस जाण्याची अनुज्ञा मागितली; परंतू आईने केवळ परवानगी नाकारली एवढेच नव्हे तर सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे पटवून देण्याचा यत्न केला. तत्क्षणीच बटूने साक्षात् श्रीपादश्रीवल्लभांचे रूप आईला दाखवून पूर्वजन्मीच्या संस्काराची आठवण करून दिली. ताबडतोब मातोश्रीला पूर्वजन्मातील सर्व गोष्टींची स्मृती झाली; व ती बटूला तीर्थयात्रेस जाण्याची अनुज्ञा द्यावयास तयार झाली. तथापि आपणास आणखी पुत्रसंतती प्राप्त होईपर्यत बटूने तीर्थयात्रेस न जाता आपल्यापाशीच राहावे अशी इच्छा तिने प्रकट केली व ती बटूने मान्य केली.''तुला चार पुत्र होतील व दोन पुत्र होईपर्यत मी येथे राहीन''असे बटूने आश्वासन दिले. 'ईश्वरेच्छा बलीयसी' या न्यायाने पुढे एका वर्षातच तिला दोन जुळे पुत्र झाले. या घटनेनंतर थोडया कालवधीने सर्वांची अनुज्ञा घेऊन श्रीनरहरी बटू काशीयात्रेस जाण्याकरिता तेथून निघाला. आईवडील त्याला पोहचवण्याकरता गावाच्या सीमेपर्यत गेले. आईवडिलांच्या भेटिकरिता आपण पुन्हा अवश्य येऊ असे सांगून त्याने मार्गआक्रमणाला सुरूवात केली.
नरहरी बटू थेट काशीस आला व त्या ठिकाणी वर्णाश्रमधर्मानुसार आचरण करू लागला. नरहरी बटूचे शास्त्रोक्त आचरण पाहून तेथील सर्व संन्याशांना आनंद झाला व त्यांनी वयोवृध्द व तपोवृध्द अशा अधिकारी कृष्णसरस्वतींमार्फत बटूने संन्यास घ्यावा असा आग्रह केला. त्यानुसार नरहरी बटूने कृष्णसरस्वतींकडून संन्यासदीक्षा ग्रहण केली व त्यांनी बटूचे नाव 'नृसिंहसरस्वती' असे ठेवले.
श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराजांनी यानंतर काही काळ काशीत वास्तव्य केले. त्या ठिकाणी पुष्कळांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. काही काळाने शिष्यासहित महाराज उत्तरेच्या यात्रेस निघाले. ह्या उत्तरेच्या यात्रेच्या निमित्ताने तीस वर्षे पर्यटन केल्यानंतर महाराज पूर्वाश्रमीच्या मातोश्रीस दिलेल्या शब्दांच्या पूर्ततेकरिता कारंजा येथे आले. आईवडील बंधुभगिनी यांच्या भेटी झाल्या. त्या वेळी तुम्हाला काशीक्षेत्री मृत्यू येऊन तुम्ही मुक्त व्हाल असे आईवडील यांना सांगितले. बहिणीस 'तुला कुष्ठरोग होईल व तुझा पती वृध्दापकाळात संन्यास दीक्षा घेईल' असे सांगून 'तुला कुष्ठरोग झाल्यानंतर पापविनाशी तीर्थावर तुझी माझी भेट होईल' असे आश्वासन दिले. 'तुमच्या वंशास दारिद्रय - पीडा होणार नाही ' असे महाराजांनी बंधूस सांगितले. त्याच वेळी महाराजांनी एकाच वेळी अनेक भक्तांकडून पाद्यपूजा ग्रहण करून आपल्या मातापितरांना पुनश्च पर्यटनास जाण्यासंबधी अनुज्ञा मागितली. थोर पदा त पोहोचलेला पुत्र पुनश्च आपल्यापासुन दूर जाणार ह्या कल्पनेनेच मातृह्दय हळहळले.
मातृह्दयाची व्यथा ओळखून महाराजांनी घरातील माडीवर एका भिंतीवर गंध शिंपडले व सांगितले की ''मला पाहण्याची जेव्हा आपणास इच्छा होईल तेव्हा निरांजन लावून शुध्द अंतः करणाने व प्रेमपूर्वक दृष्टीने या भिंतीकडे पाहा म्हणजे तुम्हाला माझे दर्शन होईल.''अशा प्रकारे सर्वाचे समाधान करून महाराज गोदावरीच्या तीर्थयात्रेस निघाले
मार्ग आक्रमण करीत असता त्यांचा मुक्काम श्रीक्षेत्र नागझरी येथे झाला. शिष्यांनी त्यांना गोदावरी तीरी जाण्याच्या संकल्पाची आठवण दिली. आपल्या शिष्यांकरिता व भक्तजनांच्या उध्दाराकरिता महाराजांनी गोदावरीलाच नागझरी क्षेत्री येण्याचे पाचारण केले व त्या प्रमाणे त्यक्ष गोदावरी येथे एका गोमुखकुंडात प्रकट झाली.
मागील पान |