स्फोटकशमन
श्रीपादश्रीवल्लभावतरामध्ये एका रजकास तू राजकुलात जन्म घेऊन राज्योपभोग घेशील व शेवटी तुला माझे दर्शन होईल असा वर महाराजांनी दिला होता. त्या प्रमाणे त्या रजकाने विदुरा नगरीतील एका म्लेंच्छ राजकुलात जन्म घेतला व पुष्कळशा काळपर्यत राजैश्वर्याचा उपभोग घेऊन तृप्त झाला. वृध्दापकाळी त्याच्या मांडीवर एक फोड झाला. नाना कारचे उपाय करूनही तो फोड बरा होईना तेव्हा एका ब्राम्हणाने त्याला सांगितले की सत्पुरूषाच्या दर्शनाने फोड बरा होईल आणि म्हणून त्याने पापविनाशी तीर्थास जावे. त्या प्रमाणे तो वृध्द राजा पापविनाशी तीर्थास गेला. तेथे त्याने स्नान केले. तत्क्षणीच एक यती तेथे आला. राजाने त्या यतीस वंदन केले. यतीने राजाला ॠषभ योग्याची कथा सांगितली व गाणगापूरवासी श्रीनृसिंहसरस्वती या सत्पुरूषाचे दर्शन घे म्हणजे तुझा फोड बरा होईल अशी सुचना केली. त्यानुसार तो गाणगापुराला येऊन महाराजांस भेटताच महाराजांनी 'का रे रजका क़ोठे अससी' असे म्हणून त्याला पूर्वजन्मीची स्मृती करून दिली व आपण दिलेले वचन पूर्ण केले. त्याच वेळी राजाचा फोड ही बरा झाला. राजाच्या आग्रहावरून महाराज त्याचे ऐश्वर्य पाहावयास गेले. 'यापुढे आपण आपले राज्य पुत्रांच्या स्वाधीन करून आम्हाला भेटण्याकरिता श्रीपर्वतावर यावे' असे त्याला सांगितले व तद्नुसार पुढे श्रीपर्वतावर त्याची व महाराजांची भेट झाली व त्यांनी त्याचा उध्दार केला.
श्री शैल्यगमन व कृपा प्रसाद
यानंतर आपली प्रसिध्दी बरीच झाली व अधिक उपाधी वाढू नये म्हणून यात्रेच्या निमित्ताने श्रीपर्वतास जावे व दृश्य स्वरूपात गाणगापूर सोडावे असा विचार महाराजांनी केला व त्या प्रमाणे आपले मनोगत आपल्या शिष्यांस विदित केले. सर्व शिष्य व भक्त यांना अतोनात वाईट वाटले.'मी दृश्य स्वरूपात ह्या पार्थिव देहाने नसलो तरी गुप्त रीतीने व अमूर्त स्वरूपात माझ्या प्रेमळ व अनन्य भक्तांकरिता मी येथे गाणगापूरास नित्य वास करणार आहे. मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवितो व तेच माझे मूर्त स्वरूप आहे असे समजा व निश्चिंत राहा 'असे आश्वसन देऊन महाराजांनी सर्वाचे समाधान केले. नंतर महाराज पुष्पासनावर बसून नदीतून कर्दळीवनाकडे जावयास निघाले. नावाडयाबरोबर महाराजांनी निरोप पाठविला की 'आम्ही जातो कलि पाहोनी सदा वसो गाणगाभुवनी मठावर पोहोचल्यानंतर चार सादपुष्पे येतील ती सायंदेव नंदी नरहरी व सिध्द या चार शिष्यांनी घ्यावी'.
उपसंहार
दश्रीगुंरूच्या काही वर्षाच्या वास्तव्याने गाणगापुरादी गावे पुण्यक्षेत्रे बनून तीर्थस्थाने झाली आहेत. परंतु श्रींचे जन्मस्थान हे काही कारणामुळे ब-याच कालपर्यत अज्ञात राहिल्यामुळे ज्या ठिकाणी श्रींनी जन्म घेतला व आपल्या दैवी बालक्रीडा केल्या ते कारंजा गाव इतके दिवस अप्रसिध्द राहिले. परंतु भुकृपेने श्रींच्या जन्मास्थानाचा म्हणजेच कारंजागावचा पूर्ण पत्ता लागल्यामुळे आज त्या ठिकाणी श्रींचे मंदिर बांधण्यात येऊन त्यात श्रींच्या मूर्तीची व निर्गुण पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. श्रीनृसिंहसरस्वतीसंस्थान कारंजा या नावाने आज ते प्रसिध्द आहे.