कोष्टयाला श्रीशैल्य दर्शन क़ुष्ट परिहरण व कल्लेश्वर महिमा
गाणगापुरास महाराजांचा कोष्टी जातीचा एक भक्त होता. शिवरात्रीच्या निमित्ताने मल्लिकार्जुनाच्या
दर्शनाकरिता त्याच्या घरची सर्व मंडळी व गावातील इतर लोक निघून गेले. गुरूभुवन म्हणजेच मल्लिकार्जुन पर्वत अशी त्याची नितांत श्रध्दा होती म्हणून तो मात्र गेला नाही. महाराजांनी त्या भक्ताला शिवरात्रीच्या दिवशी मनोवेगाने श्रीशैल्यमल्लिकार्जुन येथे नेऊन त्याला संपूर्ण यात्रा घडविली व त्या स्थानाचे महात्म्य त्याला वर्णन करून सांगितले. महाराज हेच शंकर आहेत याची चीती त्याला आली. सर्वांगावर कुष्ठ असलेला नंदी नावाचा एक ब्राम्हण होता. कुष्ठरोगाचा परिहार व्हावा म्हणून त्याने तुळजापूर येथे सतत तीन वर्षे देवीची आराधना केली. तुळजापूरच्या देवीने त्याला चंदला परमेश्वरी देवीकडे जावे म्हणजे तुझे काम होईल असा आदेश दिल्यावरून तो तेथे गेला व अविरत सात महिनेपर्यत देवीची आराधना करीत राहिला. चंदला परमेश्वरी देवीने त्या ब्राम्हणास गाणगापुराला महाराजांकडे जावे असे सांगितले. देविने दुःखाचा परिहार करण्याकरिता एका सामान्य माणसाकडे मला पाठवावे यात देवीचाच कमीपणा आहे; तेव्हा तिनेच आपणास रोगमुक्त करावे असे धरणे धरून तो देवीपाशीच राहिला. चंदला परमेश्वरी देवीच्या आज्ञेनुसार तू येथून जावे अन्यथा तुला येथून हाकलून द्यावे असा देवीचा आम्हाला आदेश आहे असा तेथील भोप्यांनी स्पष्ट इशारा दिल्यामुळे नाइलाजास्तव तो ब्राम्हण गाणगापुरास महाराजांकडे आला. संगमावरून मठात आल्यानंतर महाराजांनी त्याला अवलोकिले व देवापाशी न जाता सामान्य मनुष्याकडे कशास्तव आलास असा प्रश्न विचारला. महाराजांनी विचारलेल्या प्रश्नामुळे महाराजांच्या आगळया रूपाची प्रचीती त्या ब्राह्मणास आली. संगमावर स्नान घालून व अश्वत्थ दक्षिणा करवून पारणे करण्यास्तव त्या ब्राह्मणास महाराजांनी आणविले व त्याचे कुष्ठ घालवून त्याचे शरीर सुवर्णकांतिमय केले. परंतु मला सामान्य मानव काय देईल असा संशय धरून तो आल्यामुळे त्याच्या मांडीवर मात्र थोडे कुष्ठ शिल्लक राहिले. कवित्व करून तू आमचे स्तवन करावे म्हणजे उर्वर्रित कुष्ठ जाईल असे महाराजंनी त्याला सांगितले. त्या नंदी ब्राह्मणाच्या जिव्हेवर विभूती प्रोक्षण करून महाराजांनी त्याला ज्ञान व प्रतिभाशक्ती दान केली. त्याने केलेल्या स्तवनावर महाराज संतुष्ट झाले व त्याचे 'कवीश्वर' असे नाव ठेविले.
महाराजांच्या एका भक्ताने त्यांना हिप्परगी नावाच्या गावी नेले. त्या गावात 'कल्लेश्वर' नावाचे एक जागृत दैवत होते. त्या देवालयात जाऊन देवाची पूजाअर्चा करून तिदिनी कल्लेश्वर स्तुतीपर पाच कविता कराव्या असा तेथील नरहरी नावाच्या एका भक्ताचा परिपाठ होता.''कल्लेश्वरासि विकले जिव्हारIनरस्तुती न करी''असे म्हणून त्याने महाराजांविषयी स्तुतीपर कवने करण्याचे अव्हेरिले. परंतु त्या दिवशी नित्यनियमानुसार कल्लेश्वराची पूजाअर्चा झाल्यानंतर त्याला निद्रा आली व स्वप्नात महाराज व कल्लेश्वर एकच आहेत असे त्याला दिसले. निद्रा संपल्याबरोबर तो महाराजांकडे गेला व अनन्यभावे त्यांना शरण जाऊन आपल्या शिष्यवृंदामध्ये माझा अंतर्भाव व्हावा अशी नम्र विनंती केली. महाराजांनी त्याची विनंती मान्य केली. यानंतर नरहरीने महाराजांचे शिष्यत्व पत्करले व तेथेच कवित्व व सेवा करून राहू लागला.
अष्टस्वरूप दर्शन दहापट धान्य व अमरजा संगम माहात्म्य
दिवाळीच्या सणानिमित्त महाराजांनी आपल्या घरी यावे असा हेतू धरून निरनिराळया गावी राहणारे महाराजांचे सात थोर शिष्य गाणगापुरास आले. महाराजांनी दिवाळीचे वेळी गाणगापुरासच राहावे असा गाणगापुरच्या भक्तांनीही आग्रह धरला. तडजोड करण्यास कोणीच तयार नव्हते. अशा वेळी महाराजांनी सगळयांकडे जाण्याचे कबूल केले. दिवाळीच्या दिवशी आठ रूपे धारण करून महाराज सर्वांकडे गेले व सर्वांना संतुष्ट केले.
गाणगापुरास महाराज संगमावर स्नानास जात येत असताना एक शेतकरी आपल्या शेतातून धावत येऊन त्यांना नित्य नमस्कार करीत असे. एके दिवशी महाराजांनी त्याला त्याच्या मनातील हेतू विचारला असता महाराजांनी एकदा आपल्या शेतात यावे व ते पहावे अशी शेतक-यांनी विनंती केली. महाराज शेतात गेले व त्या शेतक-यास म्हणाले की मी स्नान करून माध्यान्ही परत येण्याच्या आत तू हे सर्व शेत कापून टाक. महाराजांचे वाक्य माण मानून इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्याने ते शेत कापून टाकले. पुढे सात - आठ दिवसांनी एकाएकी सोसाटयाच्या वा-यामुळे आणि जोराच्या वृष्टीमुळे गावातील सर्व पिकांची अतोनात नासाडी झाली. परंतु त्या शेतकर् याचे शेत मात्र शतपटीने पिकले व त्याने आपल्या शेतातील धान्य गोरगरीबांना वाटण्याकरिता अतिशय संतोषाने दिले. लक्ष्मी तुझ्या घरी अखंड वास करील असा महाराजांनी त्याला वर दिला.
गाणगापुराजवळच काशी ग़ंगा व याग ही क्षेत्रे आहेत असे भक्तवृंदास पटवून दिले व महाराज तेथून पापविनाशी तीर्थावर गेले. तेथे त्यांना त्यांची पूर्वाश्रमीची बहीण रत्नाई पूर्वसंकेतानुसार भेटावयास आली. तिच्या अंगावर कुष्ठरोग होता. महाराजांनी तिला पापविनाशी तीर्थात स्नान करावयास सांगितले. महाराजांच्या आज्ञेनुसार तिने त्या तीर्थात तीन दिवस स्नान केले व त्यामुळे तिचे कुष्ठ नाहीसे झाले.