|| श्रींचे अवतारकार्य ||
मागील पान |
गाणगापुरापासून जवळ असलेल्या कुमसी नावाच्या गावी त्रिविक्रम भारती या नावाचा एक यती नरहरीची उपासना करीत असे. त्याने गाणगापुरातील महाराजांची चरित्रलीला ऐकली व महाराजांचे आचरण संन्यासाश्रमी यतीला अयोग्य आहे अशी निंदा करावयास प्रारंभ केला. महाराज त्याच्याकडे गेले व त्याला विश्वरूप दाखवून त्याच्या भ्रमाचे त्यांनी निरसन केले आणि त्याच्यावर कृपा केली.
आपल्या पांडित्याचा गर्व झालेल्या दोन ब्राह्मणांनी राजज्ञेने राज्यातील सर्व ब्राह्मणवृंदांना वादात पराजित केले व ते त्रिविक्रम भारतीकडे वाद करण्याच्या ईर्षेने आले. परंतु त्रिविक्रम भारतीने त्यांना महाराजांकडे आणले. ब्राह्मणांनी विद्येचा गर्व सोडून द्यावा असे त्यांना परोपरीने समजावून सांगितले असतादेखील ते आपला हट्ट सोडून देण्यास तयार होईनात तेव्हा त्याच समयी वाटेने जाणा-या एका अत्यंजाला महाराजांनी बोलाविले व भूमीवर सात रेषा काढून त्याला त्या रेषा ओलांडण्यास सांगितले. सातवी रेषा ओलांडताच तो अत्यंत विद्वान झाला व महाराजांनी त्याच्याकडून त्या दोन गर्विष्ठ ब्राह्मणांचा गर्वपरिहार केला.
उपरनिर्दिष्ट दोन ब्राह्मण आपल्या पापकर्माने ब्रह्मराक्षस झाले. या प्रसंगाच्या आधारे महाराजांनी वेदांचा विस्तार अमर्याद असून ते सर्वज्ञान आकलन करून घेणे अतिशय दुरापास्त आहे हे विशद करून सांगितले.
गाणगापुरात परान्न ग्रहण न करणारा एक सात्त्वि व गरीब ब्राम्हण होता. त्याच्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची इच्छा झाली. स्वतःच्या निर्धनावस्थेची जाणीव असल्यामुळे आपल्या पतीला परान्न घेण्यास भाग पाडले असता मिष्टान्न मिळण्याची शक्यता आहे असे वाटल्यावरून ती महाराजांकडे आली व तिच्या पतीचे मन वळवून त्यांना परान्न घेण्यास वृत्त करावे अशी तिने महाराजांना विनंती केली. त्या प्रमाणे महाराजांनी त्या ब्राम्हणास बोलावून पत्नीस असंतुष्ट ठेऊ नकोस व तिच्या इच्छापूर्तीकरिता तू परान्नाचे आमंत्रण स्वीकारून भोजनास जावे असे त्याला सांगितले. तद्नुसार तो ब्राम्हण आपल्या पत्नीसह भोजनास गेला. ती जेवावयास बसली असता परान्नग्रहणदोषाचे मूर्तिमंत दृश्य महाराजांनी दाखविले. ते पाहून ती न जेवताच परत आली व तिचे मन परान्नास कायमचे विटले. या निमित्ताने महाराजांनी त्या ब्राम्हणास गृहस्थाश्रमाचा आचारधर्म विशद करून सांगितला.
गाणगापुरातील सोमनाथ नावाच्या एका ब्राम्हणाची गंगा ह्या नावाची साठ वर्षे वयाची भार्या महाराजांना नित्य आरती घेऊन येत असे. अशा प्रकारे बराच कालावधी लोटल्यानंतर महाराजांनी तिच्या मनातील हेतू विचारून तिला पुत्र व कन्या प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला.
कुष्ठरोगाने ग्रस्त झालेला नरहरी नावाचा एक ब्राम्हण रोगाला कंटाळून महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला औदुंबराचे सुकलेले एक लाकूड दिले व ते संगमाजवळ नदीकाठी रोपण करून त्यास नित्य पाणी घालण्यास सांगितले. ज्या दिवशी त्या सुकलेल्या काष्ठाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझे कुष्ठ जाईल असे सांगितले. लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून महाराजांच्या सांगण्या प्रमाणे त्याने आपला क्रम चालू ठेविले. शातव्या दिवशी महाराजांनी त्या शुष्क औदुंबर काष्ठावर कमंडलूतील उदक शिंपडताच त्या शुष्क काष्ठास पालवी आली व त्याच क्षणी त्या ब्राम्हणाचे कुष्ठ नाहीसे झाले व त्याचे शरीर सुवर्ण कांतिमय झाले.महाराजांनी त्या ब्राम्हणाला आशीर्वाद देऊन गाणगापुरास आपल्या कुटुंबासह येऊन राहण्याची आज्ञा केली.
मागील पान |