|| श्रींचे अवतारकार्य ||
मागील पान |
महाराजांचे वास्तव्य वाडीस असताना चौसष्ट योगिनी महाराजांना आरती ओवाळण्याकरिता त्यही येत असत व महाराज त्यांच्याबरोबर कृष्णेच्या पात्रात त्यांच्या घरी भिक्षेस जात असत. एके दिवशी हे दृश्य एका शेतरक्षकाने पाहीले व तोही महाराजांच्या मागोमाग योगिनींच्या घरी गेला व महाराजांबरोबर परत आला. ही घटना महाराजांनी पाहिली तेव्हा 'तुझे कल्याण होईल' असा त्याला आशिर्वाद दिला. तथापि त्याने या गोष्टीची वाच्यता व परिस्फोट कोठेही करू नये अशी सूचना दिली.
अमरापूरच्या दक्षिणेस असलेल्या अलास या गावी जोशी वृत्तीने राहणारे एक बहिरंभट या नावाचे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण होते. ते महाराजांस जाता - येता नमस्कार करीत व महाराज 'नारायण' असे म्हणून तिसाद देत. अव्याहत बारा वर्षेपर्यंत असा उपक्रम चालू होता. त्यानंतर महाराजांनी त्या ब्राह्मणावर अनुग्रह करून 'मी येथे लोककल्याणार्थ मनोहर पादुका ठेवतो त्याची पूजा तू वंशपरंपरा करावी; तू आज ऐशी वर्षाचा असलास तरी तुला एक पुत्र होईल व त्या पुत्राला पुढे चार पुत्र होईपर्यंत तुला दीर्घायुष्य लाभेल.' असा आशिर्वाद दिला व गुरूद्वादशीस त्याच्याकडून शेवटची भिक्षा घेऊन महाराज तेथेच गुप्त झाले; आणि म्हणूनच नरसोबाच्या वाडीस गुरूद्वादशी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. गुप्त होण्यापूर्वी चौसष्ट योगिनींच्या विनंतीवरून महाराजांनी अन्नपूर्णेस त्या ठिकाणी ठेविले. गुप्त होण्यापूर्वीची गोष्ट. महाराज एके दिवशी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेस गेले असता तेथे त्याच्या दारी असलेल्या घेवडयाच्या वेलाच्या शेंगांच्या भाजीची भिक्षा त्यांना मिळाली. महाराजांना ती अत्यंत गोड लागली. परत जाताना त्या ब्राह्मणाच्या दारी असलेला तो घेवडयाच्या शेंगांचा वेल महाराजांनी उपटून टाकला. आपल्या उपजीविकेचे एकमेव व अल्पसे साधन असलेला तो वेल महाराजांनी का उपटून टाकावा ह्या गुह्याचे आकलन ब्राह्मण स्त्रीस न झाल्यामुळे तिला प्रथम अतिशय वाईट वाटले. आपल्या पूर्वसंचितानुसार चांगल्या - वाईट गोष्टी आपणांस प्राप्त होत असतात परमेश्वराला दोष देण्यात अर्थ नाही असे सांगून त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीची समजूत घातली व त्या वेलीचे शिल्लक राहीलेले मूळ खणून काढून फेकून द्यावे म्हणून त्याने खणण्यास प्रारंभ केला. तोच तेथे त्याला एक द्रव्याचा ठेवा सापडला अशा रीतीने महाराजांनी त्या ब्राह्मणाचे दारिद्रय कायमचे दूर केले.
मागील पान |